13/08/2026
लातूर शहर विधानसभेत भाजपा निष्ठावंतांवर अन्याय का?
लातूर शहर भाजपातील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात आज एकच प्रश्न आहे—पक्षासाठी ३०-४० वर्षे रक्ताचे पाणी करणाऱ्यांना न्याय कधी मिळणार?
लातूर महानगरपालिका निवडणुकीतील भाजपाचे रामायण-महाभारत आता लपून राहिलेले नाही. तिकीट वाटप करताना विद्यमान नगरसेवक, जुने निष्ठावंत कार्यकर्ते आणि पक्षासाठी वर्षानुवर्षे झटणाऱ्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी होती. मात्र अनेक ठिकाणी मनमानी पद्धतीने निर्णय झाले, विद्यमान नगरसेवकांची तिकिटे कापली गेली आणि त्यामुळे पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला.
याचा सर्वात मोठा परिणाम कोणावर झाला? त्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबावर!
ज्या कार्यकर्त्याने लग्न झाल्यापासून संसारापेक्षा पक्षाला अधिक वेळ दिला, आंदोलनांपासून राममंदिर आंदोलनापर्यंत, लोकसभा-विधानसभा-महानगरपालिका-जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये रात्रंदिवस पक्षासाठी धावपळ केली, पोस्टर लावले, सतरंज्या उचलल्या—त्याच्या पाठीशी उभे राहून संसाराचा गाडा पुढे नेणाऱ्या त्या माय-माऊलीची वेदना आपण समजून घेणार आहोत की नाही?
पतीला पक्षाची उमेदवारी मिळाली नाही म्हणून एखाद्या कार्यकर्त्याच्या पत्नीने अपक्ष निवडणूक लढवली, तर त्यामागची परिस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. बंडखोरीचे समर्थन नाही; पण बंडखोरीमागची वेदना समजून घेण्याची संवेदनशीलता पक्षात असली पाहिजे.
आणखी एक गंभीर प्रश्न आहे—ज्यांनी यापूर्वी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात काम केले, ज्यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचे आरोप झाले, अशांची ‘घरवापसी’ सहज होते; मग चार दशके पक्षासाठी कोणताही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांबाबतच कठोर भूमिका का?
निष्ठा ही निवडणुकीच्या वेळी आठवणारी गोष्ट नसते. निष्ठा ही आयुष्यभराची कमाई असते!
आज पद मिळाले म्हणून काही जण मनमानी करतील, जुने कार्यकर्ते दुर्लक्षित करतील आणि पक्षासाठी आयुष्य झिजवणाऱ्यांना अपमानित करतील, तर याचा विचार भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने गांभीर्याने करण्याची वेळ आली आहे.
ज्या कार्यकर्त्यांचा राजकारणात प्रवेश झाला, त्यापूर्वीपासून हे कार्यकर्ते पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन फिरत आहेत. आज ते वयाने मोठे झाले असतील, पण त्यांची पक्षनिष्ठा अजूनही तरुण आहे.
म्हणून महाराष्ट्र प्रदेश भाजपाने लातूर शहरातील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे.
पक्षात मतभेद असू शकतात, नाराजी असू शकते; पण न्यायाची अपेक्षा ठेवणे हा गुन्हा नाही.
आज निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेली खदखद वेळेत दूर केली नाही, तर त्याचा फटका संघटनेलाच बसतो.
भाजपा ही कोणाच्या बापाची किंवा कोणाच्या पदाची मालमत्ता नाही—भाजपा ही लाखो कार्यकर्त्यांच्या त्याग, संघर्ष आणि निष्ठेने उभी राहिलेली संघटना आहे.
प्रदेश नेतृत्वाने खडबडून जागे व्हावे, लातूर शहरातील निष्ठावंतांचा आवाज ऐकावा
आणि “निष्ठेला न्याय, कार्यकर्त्याला सन्मान” या भूमिकेने पुढे जावे.
कारण…
ज्यांनी पक्षासाठी आयुष्य दिले, त्यांना पक्षाने आयुष्याच्या या टप्प्यावर एकटं सोडू नये!
आपला विवेक विध्याभुषण बाजपेई.
tavde rane Ravi Anaspure bjp