03/01/2026
*विद्येची नायिका, क्रांतिज्योती, सावित्रीमाई फुले*
सावित्रीमाईंचा जन्म ३ जानेवारी, १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे खंडोजी नेवशे पाटील यांच्या घरी झाला. सावित्रीमाई नेवशे-पाटील यांच्या ज्येष्ठ कन्या होत. १८४० साली वयाच्या १० व्या वर्षी त्यांचा जोतीरावांशी विवाह झाला. जोतीराव त्यावेळी १३ वर्षांचे होते.
लग्नानंतर जोतीरावांनी सावित्रीमाईंना घरीच शिक्षण दिलं. सावित्रीमाईंचे कर्तृत्व हे असामान्य आहे. कारण त्या पहिल्या भारतीय शिक्षिका आहेत. पहिल्या मुख्याध्यापिका आहेत. पहिल्या आधुनिक कवयित्री आहेत. पहिल्या स्त्री-निबंधकार आहेत. आणि पहिल्या स्त्री शिक्षणतज्ज्ञ आहेत. तसेच जोतीरावांना पहिले कृतिशील तत्त्वज्ञ समाजसुधारक म्हटले तर सावित्रीमाई दुसऱ्या कृतिशील तत्त्वज्ञ समाजसुधारक आहेत. जोतीरावांसारख्या ज्ञानसूर्यासमोरही सावित्रीमाईंच्या बुद्धिमत्तेचे तेज तिळमात्रही कमी होत नाही.
जोती-सावित्रींनी १८४८ साली स्त्री-शूद्रातिशूद्रांच्या शिक्षणाचे कार्य सुरू केले. याशिवाय मुलींच्या आणखी तीन शाळा अनुक्रमे ३ जुलै १८५१ व १७ नोव्हेंबर १८५१ आणि १५ मार्च १८५२ रोजी सुरू केल्या. १८४८ ते १८५२ या चार वर्षाच्या काळात सावित्रीमाई आणि जोतीरावांनी पुणे, सातारा, तळेगाव ढमढेरे, शिरूर, भिंगार, अंजीरवाडी इत्यादी ठिकाणी एकूण १८ शाळा सुरू केल्या.
क्रांतिज्योती, सावित्रीमाईंनी शिकविण्यासाठी घराच्या उंबरठ्याबाहेर टाकलेले पहिले पाऊल हीच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात होय. समाजाकडून होणारा कडवा विरोध सहन करीत आणि शिव्याशाप शांतपणे ऐकत सावित्रीमाई काम करीत होत्या. त्या शाळेत जाता-येताना सनातनी टोळभैरव मुद्दाम रस्त्यावर थांबत. अचकट-विचकट बोलत. कधीकधी दगड मारीत. अंगावर चिखल किंवा शेण टाकत असत. शाळेत जाताना सावित्रीमाईंना सोबत दोन साड्या न्याव्या लागत. रस्त्याने जाताना खराब झालेली साडी शाळेत गेल्याबरोबर बदलावी लागे. दुसरी परतताना खराब होई आणि तरीही सावित्रीमाई आपल्या कामात खंड पडू देत नव्हत्या. हा छळ असाच चालू राहिल्याने त्यांच्या व लहान मुलींच्या संरक्षणासाठी संस्थेने एका शिपायाची नियुक्ती केली. त्याने लिहून ठेवलेल्या आठवणीनुसार सावित्रीमाई आपल्या अंगावर दगड किंवा चिखल फेकणाऱ्यांना म्हणत, "मी माझ्या भगिनींना शिकविण्याचे पवित्र कार्य करीत असताना तुम्ही माझ्यावर शेण अगर खडे फेकीत आहात, ही मला फुलेच वाटतात. ईश्वर तुम्हाला सुखी ठेवो!" बळवंत सखाराम कोल्हे यांच्या ह्या आठवणी सावित्रीमाईंच्या धैर्यावर प्रकाश टाकणाऱ्या आहेत.
'शिक्षणातून जीवनातील खरेखोटे निवडण्याची क्षमता आली पाहिजे.' हा त्यांचा आग्रह होता. आद्य स्त्रीवादी लेखिका-विचारवंत ताराबाई शिंदे, पहिल्या भारतीय महिला संपादक तान्हुबाई बिर्जे, आद्य दलित लेखिका मुक्ता साळवे, पहिल्या दलित महिला संपादक सावित्रीबाई रोडे या सगळ्या सावित्रीमाईंच्या विद्यार्थीनी होत्या.
आपल्या शैक्षणिक कामांची नोंद करताना जोतीरावांनी १९ ऑक्टोबर, १८८२ रोजी शासनाच्या 'हंटर शिक्षण आयोगा'ला सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे, "जिला स्वकीय म्हणता येईल अशी एकही मुलींची शाळा त्याकाळी येथे नव्हती, म्हणून तशी शाळा स्थापन करण्याची प्रेरणा मला दिली. मी आणि माझी पत्नी अशा उभयतांनी कित्येक वर्षेपर्यंत त्या शाळेत काम केले. शिक्षण मंडळीचे अध्यक्ष सर आस्किंन पेरी आणि सरकारचे तत्कालीन सचिव लुम्सडेन यांनी मुलींच्या शाळांना भेटी देऊन शिक्षण क्षेत्रात सुरू झालेल्या या नव्या चळवळीबद्दल समाधान व्यक्त केले.
१५ सप्टेंबर, १८५३ च्या ज्ञानोदयला दिलेल्या माहितीत जोतीराव म्हणतात, "प्रथम मनात आले, की आईच्या योगाने मुलांची जी सुधारणूक होते, ती फारच चांगली असते. जे लोक या देशाचे सुखाची व कल्याणाची काळजी बाळगतात त्यांनी हा देश उत्तमावस्थेत यावा यासाठी इकडील बायकांच्या स्थितीकडे अवश्य लक्ष दिले पाहिजे व हरएक प्रयत्न करून यांस विद्या शिकविली पाहिजे. म्हणून मुलींची शाळा प्रथम घातली. परंतु त्यांना शिकविल्यामुळे आमच्या जातवाल्यांस फार वाईट वाटले व प्रत्यक्ष माझ्या बापाने देखील आम्हाला घरातून घालविले. शाळेसाठी कोणी जागा देईना. बांधावयास रुपये नव्हते. लोक आपली मुले पाठवावयास कसेकसे लाभ आहेत, हे आपल्या जातवाल्यांस समजावून त्यांची खात्री केली."
१८६३ साली जोतीराव-सावित्रीमाईंनी ब्राह्मण विधवांसाठी 'बालहत्या प्रतिबंधक गृह' सुरू केला. अनेक ठिकाणांहून ३५ ब्राह्मण विधवा १८८४ पर्यंत त्यांच्याकडे आल्या. त्यांची बाळंतपणे स्वतः सावित्रीमाईंनी पोटच्या मुलींसारखी केली. १८७४ साली काशीबाई नावाच्या अशाच एका ब्राह्मण विधवेचा मुलगा त्यांनी दत्तक घेतला. त्याला वैद्यकीय शिक्षण देऊन डॉक्टर बनविले.
ब्राह्मण विधवांच्या केशवपनाविरुद्ध नाभिक बांधवांना संघटित करून त्यांचा संप घडवून आणण्याचा कल्पक उपक्रम 'दिनबंधू' चे संपादक, कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी घडवून आणला. त्यामागची प्रेरणा सावित्रीमाईच होत्या. नाभिकांच्या या ऐतिहासिक संपाचा वृत्तांत 'दि टाइम्स' या वृत्तपत्राने ९ एप्रिल, १८९० च्या अंकात प्रसिद्ध केला. इंग्लंडमधल्या स्त्रीयांनी त्यांना अभिनंदनाचे पत्र पाठविले.
जोतीराव-सावित्रीमाईंनी सहकाऱ्यांना घेऊन २४ ऑक्टोबर, १८७३ रोजी 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली. सावित्रीमाई 'सत्यशोधक समाजा'च्या खंद्या कार्यकर्त्या होत्या.
जन्म, लग्न आणि मृत्यू या माणसाच्या आयुष्यातल्या तीन प्रमुख घटना आहेत आणि या तिनही घटनांच्या मुळाशी भटजी किंवा पुरोहित बसलेला आहे आणि तो या तिनही घटनांच्याद्वारे फार मोठ्या प्रमाणामध्ये शोषण त्या ठिकाणी बहुजन समाजाचं करत असतो. आणि म्हणून त्यांनी मुलाचं नाव ठेवण्याचा जो विधी आहे तो सत्यशोधक पद्धतीने करण्याचा, त्या मुलाला निसर्गाची ओळख करून देण्याचा, त्या मुलाचा भोवतालच्या जगाशी, पर्यावरणाशी परिचय करून देण्याचा कार्यक्रम म्हणजे नामकरण विधी सत्यशोधक पद्धतीचा, लग्न सत्यशोधक पद्धतीचं आणि मृत्युनंतरचे संस्कारसुद्धा सत्यशोधक पद्धतीचे असे पर्यायी संस्कार यांनी निर्माण केले. माणसं पोकळीमध्ये जगू शकत नाहीत. माणसांना काहीतरी आपल्याला पर्याय द्यावा लागतो आणि म्हणून सावित्रीमाई आणि जोतीराव यांचा सत्यशोधक समाज म्हणजे पर्यायी संस्कृतीची स्थापना करणारं अशाप्रकारचं एक अत्यंत महत्त्वाचं प्रबोधनकारी अभियान होतं, मिशन होतं. सत्यशोधक समाजाने पुरोहित नाकारून साध्या पद्धतीने, हुंड्याशिवाय, कमी खर्चातले विवाह लावायचा कार्यक्रम हाती घेतला. पहिला विवाह २५ डिसेंबर, १८७३ रोजी लावण्यात आला. नंतर ही चळवळ देशव्यापी झाली.
१८७७ साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडलेला होता. जोती-सावित्रींनी गावोगाव फिरून निधी जमवला. मित्रांच्या मदतीतून 'व्हिक्टोरिया बालाश्रम' सुरू केला. त्या ठिकाणी दररोज १,००० गोरगरीब मुलांना जेवण घातले जाई. सावित्रीमाई आपल्या मैत्रिणींसोबत स्वतः स्वयंपाक करून त्या मुलांना जेवण घालत.
जोतीराव-सावित्रीमाईंनी स्वतःच्या घरात एक वसतिगृह चालविले होते. दूरदूरच्या ठिकाणाहून मुले शिक्षणासाठी तिथे येत असत. लक्ष्मण कराडी जाया ह्या मुंबईच्या विद्यार्थ्याने या वसतिगृहात राहून सावित्रीमाईंच्या मायेची पाखर अनुभवली होती. त्याने आठवणीत म्हटले आहे की, "सावित्रीबाईंसारखी दयाळू व प्रेमळ अंतःकरणाची स्त्री मी अजूनसुद्धा कोठे पाहिली नाही. त्या आम्हा मुलांवर आईपेक्षासुद्धा जास्त प्रेम करीत असत."
दुसऱ्या एका मुलाने आपल्या आठवणींमध्ये सावित्रीमाईंचा स्वभाव, त्यांची साधी राहणी आणि जोतीराव-सावित्रीमाईंचे परस्परांवरील अपार प्रेम यांची विलक्षण हृद्य नोंद केली आहे. हा महादू सहादू वाघोले लिहितो, "सावित्रीबाई फारच उदार होती. तिचे अंतःकरण दयेने भरलेले होते. गोरगरिबांवर ती फार दया करी. ती अन्नदान पण फार करी. ती कोणासही जेऊ घाली. गरीब बायांची अंगावरची फाटलेली लुगडी पाहून त्यांना ती आपल्या घरातील लुगडी देई. त्यामुळे तात्यांचा खर्च फार होत असे. एखादेवेळी तात्या तिला म्हणत, "इतका खर्च करू नये." त्यावर ती शांतपणे बारीक हसत असे व "बरोबर काय न्यायचे आहे?" असे तात्यांना विचारीत असे. त्यावर तात्या शांतमुद्रेने थोडावेळ गप्प बसत असत. ते दोघे एकमेकांवर अतिशय प्रेम करीत असत.
प्रत्यक्ष त्यांच्या सहवासात वावरलेल्या व्यक्तींनी केलेले हे वर्णन आहे. कोणत्याही काल्पनिक वर्णनापेक्षा अस्सल दस्तऐवजांमधील हे सावित्रीदर्शन विलक्षण प्रत्ययकारी आहे. एक क्रांतिकारी स्त्री तिच्या घरगुती जीवनात कशी होती, ह्याचा हा पुरावा होय.
सावित्रीमाईंना स्त्री-शूद्रातिशूद्रांच्या उन्नतीची फार कळकळ असे. जोती-सावित्रींनी लोककार्यार्थ आपले सारे जीवन खर्ची घातले.
दरम्यान २८ नोव्हेंबर, १८९० रोजी जोतीरावांचे आजारपणात निधन झाले. सावित्रीमाईंनी जराही न डगमगता धैर्याने जोतीरावांचे समाजकार्य खंड पडू न देता जोमाने सुरू ठेवले. जोतीरावांच्या पश्चात सावित्रीमाईंनी सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व केले. शेवटपर्यंत त्या काम करीत राहिल्या. १८९३ साली सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षस्थान सावित्रीमाईंनी भूषविले होते. १८९६ च्या दुष्काळात सावित्रीमाई खूप राबल्या.
१८९७ साल उजाडले तेच प्लेगचे थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसे मरू लागली. सरकारने रॅंड अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचे काम हाती घेतले. यशवंत डॉक्टर झाल्यानंतर मिलिट्रित नोकरीला लागला. नोकरीनिमित्त तो परदेशात होता. सावित्रीमाईंनी यशवंतला रजा काढून बोलावून घेतले आणि ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वतः आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत, त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या ११ वर्षाच्या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीमाई तिकडे धावल्या. मुलाला पाठीवर घेऊन धावतपळत सात किलोमीटर अंतरावरील दवाखान्यात पोचल्या. त्यातच सावित्रीमाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च, १८९७ रोजी रात्री ९ वाजता त्यांचे प्लेगमुळे निधन झाले. स्वतःचे संस्थान वाचविण्यासाठी पाठीवर दत्तक पुत्राला घेऊन लढणाऱ्या लक्ष्मीबाईंच्या 'वीरगाथा' सांगणाऱ्यांनी ११ वर्षाच्या आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणाऱ्या या 'शौर्यांगणे'ची मात्र उपेक्षाच केली.
सावित्रीमाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला.
#सावित्रीमाईफुले
#क्रांतिज्योतीसावित्रीमाई
#शिक्षणाचीकल्पना
#महिलाशिक्षणाचीजननी
#स्त्रीशिक्षण
#महिलासशक्तीकरण
#बहुजनचळवळ
#सत्यशोधकसमाज
#महात्माज्योतिरावफुले
#फुलेदांपत्य
#सामाजिकक्रांती
#महानस्त्री
#प्रेरणादायीव्यक्तिमत्व
#शिक्षणहक्क