06/15/2024
नमस्कार मंडळी!
शाळेला सुट्ट्या सुरु झाल्या आहेत, आता अनेकांना पर्यटन, मायदेशी जाण्याचे वेध लागले असणार आहेत.
ह्या सगळ्या धांदलीत सगळे गुंग व्हायच्या आधी एक प्रेमळ आठवण करून देत आहे! यंदा देखील आपण सर्व जण निसर्ग वारी साजरा करणार आहोत.
हे वारीचे चौथे वर्ष आहे! जी मंडळी नवीन असतील त्यांच्यासाठी निसर्ग वारीचे स्वरूप थोडक्यात अधोरेखित करते,
कोविड काळात जेव्हा महाराष्ट्रात वारी प्रतीकात्मक स्वरूपात करण्यात आली तेव्हा आपण इथे अमेरिकेत, अटलांटा इथून पहिली आंतरराष्ट्रीय वारी आयोजित केली होती, त्या वर्षी अटलांटाचे १२० वारकरी आपल्यासोबत तब्ब्ल ३१ दिवस चालत होते. आषाढी एकादशीला सगळे भेटून एक मैल टाळ मृदूंगाच्या गजरात चालले आणि स्थानिक जातीची चाळीस ब्लूबेरी ची झाडे आपण लावली. निसर्गात, चराचरात पांडुरंगाची प्रचिती अनुभवत मंडळी चालत होती, अंतर होते १५५ मैल, देहू ते पंढरपूर जेवढे अंतर आहे, तेवढे हे अंतर असून, वारकरी हे अंतर २१ दिवसात पूर्ण करतात तर आपण दहा दिवस अधिक घेऊन, हे अंतर पूर्ण केले! सगळ्यांनी मिळून तब्ब्ल १०,००० मैल इतके अंतर पहिल्या वर्षी पूर्ण केले होते!
नियम सोपे आहेत,
प्रत्येकाने दररोज जमेल तसे ५ मैल अंतर चालायचे, घराजवळील बागेत, कुठे पार्क मध्ये अथवा अगदी नॅशनल पार्क मध्ये देखील! वाटेत निसर्गाच्या मनहरी रूपात पांडुरंग शोधत, त्याची छायाचित्र घेता आली तर घेत चालायचे आहे. शेवटच्या दिवशी सगळ्यांनी एकत्रितपणे भेटून पारंपरिक वारीसारखे चालत एक मैल अंतर पूर्ण करायचे आणि स्थानिक झाडे लावायची.
निसर्ग वारीत सहभागी होण्यासाठी खालील फॉर्मम भरणे आवश्यक आहे आणि सर्व सहभागी लोक एका व्हाट्सअँप ग्रुप वरून जोडली जातील. प्रत्यकाला ई-मेल आणि व्हाट्सअँपच्या माध्यमातून रोज एक अभंग आणि निरूपण पाठवण्यात येईल. तसेच चालताना सोबत म्हणून १ तास ४० मिनिटे एवढ्या लांबीची एक अभंगांची प्लेलिस्ट spotify आणि जियो सावन वरून पाठवण्यात येईल.
निसर्ग वारीत रोजचे आपले अंतर ५ मैल किंवा कमी अधिक असेल तसे रोज गुगल स्प्रेडशीट वर नोंदवायचे आहे.
शेवटच्या दिवशीबाबतच्या सविस्तर सूचना कालांतराने सांगत राहू.
यंदा आपली वारी १७ जून रोजी सुरु होऊन १७ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी संपन्न होणार आहे.
(भारतातील मूळ वारी २८/२९ जून रोजी सुरु होणार आहे)
नोंदणीसाठीचे फॉर्म : https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfmlF80ZnjyMlInbbS0BTeCdldWgsgS8kpWWUWDjpr3sLaTXg/viewform?usp=sf_link
तर चला १५ जून पर्यंत नोंदणी करून यंदाच्या निसर्गवारीत सहभागी व्हा! आपल्यासोबत आपली लहान मुले, वृद्ध आई वडील, शेजार पाजारचे सर्वच मंडळी वारीत भाग घेऊ शकतात, प्रत्येकी एक फॉर्म अवश्य भरावा!
तसेच तुम्ही गावाला जाणार असाल तरी कुठूनही चालू/धावू शकता, सायकल, अथवा पोहून देखील अंतर पूर्ण करता येऊ शकते. अंतर कमी जास्त झाले तरी चालेल, सातत्य महत्वाचे आहे.
जय हरी विठ्ठल!
ॲटलांटा निसर्ग वारी २०२४ - १७ जून ते १७ जुलै For more details please refer : https://sites.google.com/view/nisargavaari/home OR email : [email protected] You are free to walk alone, with a friend or family member, you can walk ...