07/06/2026
इतिहास संशोधक, ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते भूषण देशमुख यांचे निधन
अहिल्यानगर, दिनांक 6 जून 2026...
महाराष्ट्रातील समर्पित इतिहास संशोधक, ज्येष्ठ पत्रकार आणि स्नेहालय संस्थेचे संस्थापक सदस्य भूषण गोपाळ देशमुख यांचे काल दुपारी 2 वाजून 16 मिनिटांनी मेंदू विकारावर उपचार घेताना खासगी रुग्णालयात निधन झाले, ते 63 वर्षांचे होते.
गुजरात मधील अमदाबाद येथे 7 जुलै 1963 रोजी जन्मलेल्या श्री . भुषण देशमुख यांचे पितृछत्र 1971 मध्ये हरपले . त्यानंतर आईच्या वडिलांकडे ,आजोळी त्यांचे शालेय शिक्षण जामखेड ( जि. अहिल्यानगर) येथील ल ना होशिंग विद्यालयात झाले.
पुणे येथील फर्गुसन महाविद्यालय आणि त्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते टेक्स्टाईल इंजिनिअर झाले . मुलत: इतिहास संशोधन, लेखन आणि माध्यम क्षेत्राची त्यांना अत्यंत आवड होती.
त्यामुळे कापडांच्या काही नामांकित मिल्स मध्ये त्यांनी अल्पकाळ काम करून माध्यम क्षेत्रात ते कार्यरत झाले .
सोलापूर येथील दैनिक संचार , नगर मधील दैनिक सार्वमत आणि दैनिक समाचार येथे उपसंपादक आणि बातमीदार म्हणून त्यांनी काम केले.. 1986 पासून दैनिक केसरी पुढे दीर्घकाळ दैनिक लोकसत्ताच्या अहिल्यानगर आवृत्तीत त्यांनी वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केले. वर्ष 2014 नंतर दैनिक दिव्य मराठी या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून त्यांनी काम केले. महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांवरील सखोल लिखाणासाठी ते प्रसिद्ध होते.
1989 साली स्नेहालय संस्थेच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता . संस्थेचे विश्वस्त म्हणून दोन दशके त्यांनी काम पाहिले.
वर्ष 2008 मध्ये स्नेहालय तर्फे रेडिओ नगर 90.4 एफ एम हे समुदाय रेडिओ केंद्र ( कम्युनिटी रेडिओ स्टेशन ) सुरू करणे त्यांनी पुढाकार घेतला . स्थापनेपासून आजअखेर या रेडिओ केंद्राला देशातील अग्रणी समुदाय रेडिओ केंद्र बनवण्यात भूषण यांचे विशेष योगदान होते..
================
*नगरचा इतिहास आणि हेरिटेज वॉक*
================
अहिल्यानगर ( पूर्वीच्या अहमदनगर ) शहराच्या तसेच महाराष्ट्राच्या इतिहास आणि संस्कृतीबद्दल भूषणजी यांचा गाढा व्यासंग होता. गेली 5 वर्षे दर रविवारी नगर मधील तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी ते हेरिटेज वॉक च्या माध्यमातून विनमूल्य नगर परिसरातील सर्व ऐतिहासिक ठिकाणे दाखवत आणि त्यांची माहिती देत.
नगरमधील शाळा आणि महाविद्यालयांमधून गेली दोन दशके ते सातत्याने ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रश्नमंजुषा, निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन भूषण करीत आले. अहिल्यानगरच्या पंचशताब्दीचे आयोजन करण्यात जयंत येलुरकर यांच्यासोबत त्यांनी समरसून काम केले. नगर मधील महापुरुषांच्या वास्तुंवर निल फलक लावण्याच्या उपक्रमातही त्यांचा पुढाकार होता. नगरचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी ते सातत्याने प्रबोधन आणि चळवळ करीत. अहमदनगरच्या प्रसिद्ध भुईकोट किल्ल्याचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्याच्या शासनाच्या उपक्रमात डॉक्टर पी. अनबलगंन जिल्हाधिकारी असताना त्यांनी मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.
स्नेहालय संस्थेच्या दोन्ही भारत-बांगलादेश सायकल यात्रेच्या आयोजनात भूषण यांचा सहभाग होता. ते स्वतः सायकल चालवित यात सहभागी झाले होते.
स्नेहालयाच्या बहुतांश पुस्तकांचे संपादन आणि प्रकाशन करण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते.
नगर दर्शन हे नगरच्या इतिहासावरील त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. अहिल्यानगर जिल्हा वस्तुसंग्रहालयाच्या कामातही तसेच मोडी लिपी प्रशिक्षण उपक्रमात ही त्यांचे योगदान होते. छत्रपती शिवाजी महाराज ,संभाजी महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या चरित्र लेखक असलेल्या प्रख्यात इतिहास तज्ञ आणि लेखिका मेधा देशमुख भास्करन यांच्या लेखनाचे पहिले वाचन करण्याची संधी भूषणजी यांना नेहमी मिळाली..
महान योग्यतेचा इतिहास तज्ञ आणि संशोधक गमावल्याची खंत श्रीमती मेधा देशमुख यांनी आज शोकसंदेशात व्यक्त केली...
===========
सर्पदंशाचे निमित्त
============
भारतीय लष्करातील काही प्रमुख लोकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना नगरच्या भुईकोट किल्ल्याची माहिती देण्यासाठी 22 एप्रिल रोजी भूषणजी गेले होते. यावेळी त्यांना विषारी सापाचा दंश झाला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांना व्हेंटिलेटर आणि डायलिसिस यांची गरज पडली. डॉक्टर अभिजीत पाठक आणि स्वास्थ्य हॉस्पिटलच्या टीमने मेहनत घेऊन त्यांना उपचार दिले. 15 मे पर्यंत उपचार घेऊन ते घरी परतले. स्नेहालयाच्या स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्रात फिजिओथेरपी आणि आणि उपचारांसाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. दिनांक 28 मे रोजी त्यांना श्वसन घेण्यास त्रास झाला. रुग्णालयात नेले असता हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा आणि रक्तपुरवठा कमी झाल्याने मेंदूचे कार्य मंदावले. एका आठवड्याच्या उपचारानंतर आज त्यांची प्राणज्योत मालवली...
भूषणजी यांच्या निधनामुळे इतिहास संशोधन - संस्कृती - कला- पत्रकारिता - समाजसेवा या क्षेत्रांचे अभूतपूर्व नुकसान झाले ... भूषण देशमुख सर ऐतिहासिक अहिल्यानगरचे खरे भूषण होते. निर्गर्विष्ठ आणि अहिल्यानगरच्या सर्व ऐतिहासिक वास्तूंची खडा न खडा माहिती असलेले व्यक्तीमत्त्व म्हणजे भुषणजी देशमुख . २०१५-१६ साली इंजि. मकरंद देशपांडे सर अध्यक्ष असताना कविता जैन मॅडमच्या संकल्पनेतून महिन्यातील एका रविवारी हेरिटेज वॉकचे आयोजन त्यांनी आपल्या संस्थेसाठी केले होते. अहिल्यानगरमधील जवळपास सर्व महत्वाच्या ऐतिहासिक वास्तूंची माहिती त्यांनी तेव्हा आपल्या सर्वांना दिली होती. वक्तशीरपणा हा त्यांचा एक आणखी महत्वाचा गुण होता, वेळेआधी ते प्रत्येक हेरीटेज वॉक साठी हजर असतं. संस्थेतील सभासदांविषयी त्यांचा विशेष जिव्हाळा होता, आपल्याला त्यांची मदत लागल्यास ते नेहमीच हात पुढे करण्यास तत्पर असत. पुण्यातील नामवंत आर सी सी डिझाइनर इंजि. सतिश मराठे सर, सातारा सांगली मध्ये प्रॅक्टिस करणारे आर्किटेक्ट प्रविण माळी यांच्या साठी त्यांनी आपल्या संस्थेचे प्रतिनिधीत्व करताना हेरिटेज वॉक मधून आपल्या ऐतिहासिक समृद्धीची माहिती त्यांना करून दिली. त्यांच्या नजरेतून शहराचा इतिहास ऐकला की आपले शहराविषयी प्रेम कितीतरी पटीने वाढणार यात शंका नसायची. संस्थेसाठी त्यांनी ऐतिहासिक वास्तू संग्रहालयात खास शहरातील वास्तूची माहिती सभासदांसाठी सादर केली. आपल्या विविध कार्यक्रमांना त्यांना निमंत्रित केल्यावर ते मानसन्मानाची अपेक्षा न करता प्रेक्षकांमधील शेवटच्या आसनावर बसून व्याख्यात्याची मुलाखत रेकॉर्ड करून घेत असत. भुईकोट किल्ला संवर्धन आणि पर्यटनासाठी विकास, अप्पू हत्ती पुतळा, माळीवाडा कमान अश्या शहरातील पौराणिक वास्तूंची आणि त्यांना जतन करण्याची तळमळ त्यांच्या बोलण्यातून नेहमीच जाणवत असे. आपल्यातील बऱ्याच सभासदांच्या आर्किटेक्ट इंजिनीअर्स या नात्याने मुलाखती त्यांनी स्नेहालय एफ एम माध्यमातून घेतल्या. त्यांच्या जाण्याने शहराच्या ऐतिहासिक वास्तूंची माहितीचा ठेवा जतन करणारे एक अमूल्य रत्न आपण गमावले आहे. आपल्या आर्किटेक्ट इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असो. अहिल्या नगरच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली... 🙏🙏.