28/08/2020
मखराआधीच भरून जातं,
मखरासारखं मन!
बाप्पा येऊन बसतो आणि
मोर होतं वन!
जास्वंदीच्या फांद्यांवरती,
देठ अधीर तुटायला!
वाटेत दुर्वा वाट बघतात,
कधी येतील खुडायला!
घरच लागतं दरवळायला,
डोळे तेवू लागतात!
श्वास धूप आणि स्पर्श
फूल होऊ लागतात!
शब्द चुकतात आरतीचे पण
चुकत नाहीत भाव!
काय असते अशी जादू,
देऊळ होतं गाव!
नेहमीपेक्षा वेगळी माणसं,
येतात घराघरात!
मंतरलेला पूजाभावच,
प्रत्येकाच्या स्वरात!
काहीच उत्तर नसूनसुद्धा,
प्रश्न बसतात लपून!
माळ ओठात बोलू लागते,
मणी जपून जपून!
अन्नब्रह्म रोजचंच तरी,
प्रसादाचा अर्थ!
मखरात बसल्या तांब्यामधलं
पाणी होतं तीर्थ!
प्रत्येक डोळ्यात तरंगू लागते
तुकोबाची गाथा!
हातामधल्या प्रसादावर,
झुकून टेकतो माथा!
जागरण असतं स्वप्नासारखं,
श्रमच होतात आराम!
स्वल्पविराम घेत शेवटी,
पहाट पूर्णविराम!
एक दिवस निरोपाचा,
पापण्यात भिजते वाट!
नदीवरून मागे येतो,
फक्त रिता पाट!
पुढच्या वर्षी लवकर या।।
LOK UDYAN CHA MAHARAJA 2020!!!