Vinay wagh&associates

Vinay wagh&associates soft skills and business management trainings.

25/05/2024

वदनी कवळ घेता....

जेवायच्या आधी शाळेत सक्तीने म्हटला जाणारा श्लोक...एका विशिष्ट लयीत.. चालीत..आवडणारा..
आज हे आठवायला कारण ही तसे वेगळेच घडले .थोडेसे वेगळे पण चकित करणारे...
दुपारचा साधारण दीड वाजला असावा..रस्त्याच्या कडेला हाताने चालवायच्या लाकडी घाण्यासारख्या यंत्राने ऊसाचा रस काढून देणाऱ्या एका कुटुंबाला हा श्लोक म्हणताना ऐकले आणि क्षणभर थांबलोच
नवरा बायको आणि त्यांची पाच सहा वर्षाची छकुली..एका सुरात हा श्लोक म्हणत होते..म्हणून झाल्यावर समोर वाढलेल्या डब्यातल्या अन्नाला नमस्कार करून यांनी जेवायला सुरुवात केली..
कुतुहलाने मी विचारलेच..काय दादा?? हल्ली हा श्लोक फारसा ऐकू येत नाही..बरे वाटले ऐकून..
अन्नाचा आदर करणे हे माझ्या आई बाबांना कुणी शिकवले होते माहित नाही..पण लहानपणापासून हे मनात बिंबले आहे..आणि माझ्या वाट्याला दोन वेळचे अन्न येतेय ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप मोठी गोष्ट आहे याची जाणीव सुद्धा आहे आम्हाला..इतके बोलून हलकेसे हसले दादा..
मी पुढे निघालो..ही जाणीव आहे आम्हाला हे काही केल्या डोक्यातून जाईना..
खरेच ही जाणीव महत्वाची आहेच ना?? सारी धडपड..मेहनत..कष्ट ज्या अन्नासाठी सुरू आहे त्याची जाणीव असायला हवी हे त्या दादा आणि त्याच्या कुटुंबीयांना किती व्यवस्थित कळलेले आहे ..
मला सर्व साधारण घरातला सध्याचा जेवण करण्याचा सोपस्कार सर्रकन डोळ्यासमोर आला..
समोर टीव्ही..एका हातात मोबाईल पाहणे सुरू आणि दुसऱ्या हाताने जेवण..काय यातले महत्वाचे वाटतंय हे वेगळे सांगायची गरज नाही..
बदलणाऱ्या काळात सगळ्यात काय बदलले असेल तर या छोट्या छोट्या परंतु अतिशय महत्त्वाच्या जाणीवा...
या जाणीवा बदलून चालायचे नाही..आपण यंत्र नाही..वंगण मिळाल्यासारखे जेवण घेणे आणि मशीन प्रमाणे ऑपरेट होत राहणे हे आपले संस्कार नाहीत..आणि संस्कृती ही नाही..त्या अन्नाचा आदर करणारी आपली पूर्वापार चालत आलेली संस्कृती ...अन्नाला पूर्णब्रह्म मानणारी..आदर तर हवाच..
फक्त आदर करण्याबरोबरच काही व्यक्ती आपले आयुष्य पणाला लावतात म्हणून हे अन्न ग्रहण करतोय आपण ही जाणीव सुद्धा हवीच.. आत्महत्या आणि आर्थिक संकटाचा सामना करत..दिवसरात्र घाम गाळत आपल्या शेतात भाज्या,तांदूळ ,गहू यांचे पीक घेणारा शेतकरी..आपण सुखात..स्वातंत्र्य अनुभवत समाधानात दोन घास खावेत म्हणून उणे चाळीस अंश इतक्या बोचणाऱ्या थंडीत आपल्या सीमेचे रक्षण करणारे जवान..खूप जणांचे योगदान..या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त होऊन आणि अन्नाचा आदर करणाऱ्या श्लोकाचे पठण करून अन्नग्रहण करणे ही प्रथा असायला हवी असे माझे मत आहे..
कितीतरी कष्ट आणि कितीतरी दमवणाऱ्या प्रक्रियेच्या आतून गेल्यानंतर मिळणारे फलित म्हणजे अन्नग्रहण..ते बनवणाऱ्या माऊलीच्या कष्टांचाही आदर असायलाच हवा..अन्यथा फक्त सोपस्कार राहिला तर दर्शनी ते साधे वाटत असेल तरी त्याचे दूरगामी परिणाम मात्र निश्चितपणे योग्य नसतील..
सहज उपलब्ध झालेय म्हणून त्याचा अनादर करणे..फुकट घालवणे.. अन्न पदार्थाना घेऊन त्यांची नासाडी करणे हे प्रकार फोफावत जात असलेल्या वातावरणात अन्नाचा आणि ते आपल्या पर्यंत पोचण्यात ज्या व्यक्तींचे योगदान आहे त्या सर्वांप्रती कृतज्ञता..आदर ..चवीचा आनंद..तृप्ती या सोबत अन्नग्रहण होत असेल तर तो मंगल सोहळा असेल रोज... वदनी कवळ घेता...या श्लोकाने सुरू होणारा...

- विनय वाघ
मराठी माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व स्तरांवर उपलब्ध असलेल्या मार्गदर्शनासाठी ....जॉईन करा.. हा ग्रुप कुणाचीही खाजगी माहिती किंवा नंबर सुद्धा कुणाशी शेअर करत नाही..
सहज सारथी परिवार व्हॉट्सॲप कम्युनिटी :
https://chat.whatsapp.com/FB8VfKD1ftq1iZNGJYgedq
सहज सारथीसह आनंदी आयुष्याचा दिशेने तुमच्या प्रवासाला सुरवात करा. असेच सकारात्मक मार्गदर्शन आणि प्रेरणेसाठी आमचे पेज फॉलो आणि शेयर करा.
फेसबुक : https://www.facebook.com/sahajsarathihelp
युट्युब : https://youtube.com/?si=qvF_T9PpgMVZRwjp
इंस्टाग्राम : https://www.instagram.com/sahajsarathihelp/
संपर्क क्रमांक: +91 8689 8484 04 / 08
Email: [email protected]
धन्यवाद
सहज सारथी टीम.
www.sahajsarathi.in
Copyright © 2024 सहज सारथी - विनय वाघ. All rights reserved.

17/05/2024

अळुवडी.....

त्यांच्या मैत्रीची उदाहरणे दिली जायची...लहानपणापासून च अगदी पहिली इयत्तेपासून दोघांची जमलेली गट्टी...काहीही असो हे दोघेच एकत्र दिसायचे..खेळ असो..अभ्यास असो..सांस्कृतिक कार्यक्रम असोत..किंवा शाळेतले स्पोर्ट्स असोत..दहावी नंतर सुद्धा एकाच कॉलेज मध्ये.. एकाच वाणिज्य शाखेत... एकाच कंपनीत कुणाच्यातरी ओळखीने एकत्र च लागली नोकरी..इतकी घट्ट मैत्री...
एकमेकांशिवाय जगणे ..विचार सुद्धा करू शकत नाहीत अशी अवस्था..लग्न सुद्धा दोघांनी ठरवून एकच महिन्यात केलेली..दोघानाही बाळ झाले तेही लग्नानंतर एका वर्षाच्या आतच...एकच कॉलनीत राहत होते दोघे..आणि लग्नाच्या दोन वर्षानंतर एकाच नव्या कॉम्प्लेक्स मध्ये दोघेही shift झाले...
कुणाची दृष्ट लागली माहित नाही..पण लग्न झाल्यापासून साधारण दोन वर्षांनी छोटे मोठे खटके मैत्रीत उडू लागले..त्याचे रूपांतर वादात होऊ लागले..इतक्या वर्षात ज्याचा लवलेश ही नव्हता तो इगो चोरपावलांनी आत घुसला होता..पहिली ठिणगी पडण्याचे कारण तसे शुल्लक होते..एकाच्या बायकोने सुट्टीतले फिरायला जायचे प्लॅनिंग केलेलं..नवऱ्याला न सांगता..सरप्राइज म्हणून..आणि तिने फक्त आपल्या आपल्या फॅमिली चे बुकिंग केलेले..हे जेव्हा तिच्या नवऱ्याला कळले तेव्हा त्याने विचारले सुद्धा अग माझ्या मित्राचे काय...आम्ही एकमेकांशिवाय कुठेही जात नाही हे तुला माहीत नाही का ...पण तो विषय फार वाढला नव्हता...sorry म्हणून तिने तो तिथेच संपवला होता ..
याने मात्र आपल्या मित्राला ही गोष्ट सांगितल्यावर दुसऱ्याला प्रचंड हर्ट झाले .असे होऊच कसे शकते .तू माझ्याशिवाय जाऊच कसा शकतोस??? इथवर येत येत आता काही गोष्टींवर मतभेद होणे जे सुरू झाले नव्हते इतक्या वर्षात ते सध्या नेहमीचे होऊ लागले..
दुरावा वाढू लागला..भेटीगाठी कमी होऊ लागल्या..एकमेकांना वेळ देणे जाणीवपूर्वक कमी केले दोघांनी..आता दोघानाही एकमेकात कमी आहेत काहीतरी हे दिसू लागले..त्याचा उल्लेख वारंवार होऊ लागला ..त्यांची घट्ट मैत्री विरळ होतेय हे जाणवू लागले..आणि दोघानाही याचा प्रचंड त्रास होत होता..पण दोघेही या बाबतीत एकमेकांशी बोलत नव्हते...
एकाच्या घरी पूजा होती...दुसरा सहकुटुंब आलेला तिथे..त्याला आत बोलावले पहिल्या मित्राच्या आईने..काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे असे सांगून..तो आतल्या खोलीत गेला . बाकी सगळे बाहेरच्या च खोलीत होते..आई ने त्याला शेजारी बसवले ..डोक्यावरून हात फिरवला त्याच्या..त्याच्यासाठी च फक्त काढून ठेवलेल्या त्याच्या आवडीच्या अळू वड्यांचा डबा त्याला दिला .तो उघडुन त्यातली एक वडी त्याला प्रेमाने भरवली..लहानपणापासून अळुवडी याच आईच्या हातची आवडायची त्याला..आई इतकेच म्हणाली..बघ..या वड्यांकडे..तुला नेमके काय आवडायचे या वड्या खाताना...चव की ज्या मायेने तुझ्यासाठी त्या केल्या जायच्या ते प्रेम..तू खाल्ल्याशिवाय आमच्या घरचे कुणीही वडीला स्पर्श ही करत नसत हे ठाऊक आहे ना??
गेल्या सहा महिन्यात आमच्या घरी एकदाही अळू वडी झालेलीच नाही... अरे इतकेच काय..गेले सहा महिने तुझा मित्र रात्रीचा धड जेवत नाहीये..तुमच्यात काय झालंय मला नाही माहित..पण तुझीही अवस्था वेगळी नसणार मला माहित आहे... अरे राजा.. माझ्याही हातची वडी कधीतरी चवीला बिघडेल सुद्धा..पण त्यामागचे प्रेम ..तुझ्यासाठी ती करण्याची उर्मी हे कधीतरी बदलेल असे वाटत का तुला??
तुझ्या मित्राच्या बायकोने चुकून केलेल्या एका चुकीची शक्ती इतकी मोठी असू शकेल का की जी तुम्हा दोघांना दूर करू शकेल?? याचा अर्थ तुमच्या मैत्रीची अळूवडी चवीला मुळातच चांगली नव्हती..इतकी वर्ष ती चांगली असल्याचं फक्त दाखवता आहात तुम्ही.. पायाच भक्कम नाही मैत्रीचा..दुसरा कुणीही येऊन तुम्हाला दूर करण्याची हिम्मत ठेवत असेल तर तुमची मैत्री फक्त इतकी वर्ष जुनी आहे इतकेच म्हणेन मी..एवढ्याशा गोष्टीने एकमेकांशी असलेले नाते डळमळीत होऊच कसे शकते?? अशा गोष्टी तर होणारच आहेत...दोघांच्या बायका ..त्या काही मैत्रिणी नाहीत इतक्या वर्षांच्या...प्रत्येकाला आपापली स्पेस हवीच ना रे..म्हणून तुमच्या मैत्रीत बाधा कशी काय येऊ शकेल?? अरे जगाच्या पाठीवर शरीराने कुठेही असाल तरी मनाने आणि हृदयाने कायम सोबत असलेली मैत्री ही खरी मैत्री...इतक्या वर्षात इतके साधे एकमेकांना समजून घेणे जमले नाही का तुम्हाला?? मैत्रीत पझेसिव्ह आहात हे ठीक आहे...हक्क आहे तुमचा..पण एकमेकांना समजून घेणे हे आतून असायलाच हवे ना रे..
वेड्यावाकड्या पानांच्या आकारातून ..प्रसंगी उष्ण अशा उकडीच्या प्रक्रियेतून..आणि शेवटी कापली जाऊन सुद्धा ..आंबट गोड सगळ्या प्रकारची.तावून सुलाखून भाजून सुद्धा शेवटी उरते ती फक्त तुझ्या सारख्याला आवडणारी अळुवडी..माझे काय बाबा..मला जे दिसले ते मी सांगितले उदाहरण देऊन..तुम्ही खरी हुशार पोरे..कुठे या राग रुसव्यात सोन्यासारखी मैत्री दाव्यावर लावताय..प्रेमाने बनवलेली वडी तितक्याच प्रेमाने खात राहा रे फक्त..तेच खरे असते ..बाकी काही नाही..सगळे क्षणिक..
या मित्राच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या..तोवर दुसरा मित्र सुद्धा दारात हे सगळे ऐकत डोळे पुसताना दिसला..
दोघेही तडक तिथून निघाले..बाईक काढली..आवडीच्या जागेवर..जिथे ते नेहमी जात..एक छोटेसे मंदिर.. तिकडे गेले दोघेही..एकमेकांकडे फक्त पाहिले दोघांनी..घट्ट मिठी..पुन्हा कधीही वेगळे न होण्याची खात्री देणारी...आणि सोबतीला आई च्या अळुवडीचा डबा होताच..त्यातली एक अळुवडी काढून दोघांनी एकमेकांना भरवली..खरे तर ती अळुवडी नव्हतीच..विश्वास..प्रेम आणि सोबत यांचे प्रतीक असलेली ती अळुवडी..तिने आपले काम केले...आणि विरळ नाते पुन्हा समृद्ध होत घट्ट विणले गेले..पुन्हा कधीही न उसवण्यासाठी...
- विनय वाघ

मराठी माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व स्तरांवर उपलब्ध असलेल्या मार्गदर्शनासाठी ....जॉईन करा.. हा ग्रुप कुणाचीही खाजगी माहिती किंवा नंबर सुद्धा कुणाशी शेअर करत नाही..

सहज सारथी परिवार व्हॉट्सॲप कम्युनिटी :
https://chat.whatsapp.com/FB8VfKD1ftq1iZNGJYgedq

सहज सारथीसह आनंदी आयुष्याचा दिशेने तुमच्या प्रवासाला सुरवात करा. असेच सकारात्मक मार्गदर्शन आणि प्रेरणेसाठी आमचे पेज फॉलो आणि शेयर करा.
फेसबुक : https://www.facebook.com/sahajsarathihelp
युट्युब : https://youtube.com/?si=qvF_T9PpgMVZRwjp
इंस्टाग्राम : https://www.instagram.com/sahajsarathihelp/

संपर्क क्रमांक: +91 8689 8484 04 / 08
Email: [email protected]
धन्यवाद
सहज सारथी टीम.
www.sahajsarathi.in

Copyright © 2024 सहज सारथी - विनय वाघ. All rights reserved.

03/05/2024

प्रवेश...

नाटकाचा दुसरा अंक सुरू झालेला..पहिल्या अंकातल्या अप्रतिम अभिनयाने रसिकांची मने जिंकून कलाकारांची टीम नव्या उत्साहाने दुसऱ्या अंकाची सुरुवात करायला गेलेली...
कलाकार रंगमंचावर आपल्या लाजवाब अदाकारीने कला सादर करत असतानाच कसल्याशा आवाजाने प्रेक्षकांमध्ये गोंधळ सुरू झाला...सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा त्या आवाजाच्या दिशेने वळल्या..कलाकारांनी काही वेळ नाटक थांबवले..
एक म्हातारे बाबा मोठमोठ्याने ओरडत होते..दाढी वाढलेली..केस पूर्ण पिकलेले..आणि केसांच्या जटा झालेल्या...अस्वच्छ कपडे आणि एकंदरीत राहायला घर नसावे अशी काहीशी स्थिती पाहताक्षणी वाटावी अशी..बाबा मोठमोठ्याने ओरडत होते..चुकीचे बोलतोय हा..असा संवाद नाहीये... मधली दोन स्वगते का गाळली तुम्ही?? आणि मधले संगीत पद सुद्धा घेतले नाही..मनमानी कराल काय?? वाटेल तसे नाटकाला गुंडाळलेले खपवून घेणार नाही...वैगरे वैगरे..
काही जणांनी बाबा ना ताब्यात घेतले आणि सभागृहा च्या बाहेर नेले..प्रेक्षक स्थिरस्थावर झाले आणि नाटक पुन्हा सुरू झाले..
बाहेर नेलेल्या बाबांना त्यातल्या एका व्यक्तीने ओळखलेले...
दोन दशके आपल्या समर्थ आणि सशक्त अभिनयाने रसिकांच्या मनात गारुड केलेले आणि संगीत रंगभूमी चे कर्ते धर्ते साक्षात मदनराव करमरकर होते ते...काळाच्या वेगात सरणाऱ्या जगात संगीत रंगभूमी जिथे वेगाने संपत होती त्याच कालावधीत संगीत रंगभूमीला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या मोजक्याच शिलेदारां पैकी एक मदनराव...त्यांच्या एन्ट्री ला पडणाऱ्या टाळ्या थांबत नसत..किमान पाच मिनिटे टाळ्यांच्या कडकडाटाने सभागृह दणाणून जात असे..मदनराव म्हणजे नाटक अशी समीकरणे झालेली..मदनराव यांच्या सोबत काम करायला मिळणे म्हणजे सात जन्माची पुण्याई फळाला आली असे मानण्याची पद्धत होती सह कलाकारांमध्ये..नाट्य आणि संगीत जपणारा..आपल्यातल्या प्रतिभेने कलेला समृद्ध करणारा प्रतिभावंत म्हणजे मदनराव करमरकर..
त्यावेळचे अतिशय प्रसिद्ध..श्रीमंत..आणि करारी व्यक्तिमत्त्व..
त्यांच्या नाटकाला आवर्जून हजेरी लावणाऱ्या त्या व्यक्तीला आजची त्यांची अवस्था पाहून क्षणभर स्तब्ध झाल्यासारखे झाले..त्यांना बाहेर काढून बाकीची मंडळी निघून गेली आत पुन्हा..
ही व्यक्ती मात्र मदनराव यांच्यासोबत थांबली बाहेर..
त्यांची आदराने विचारपूस करू लागली..त्यांना चहा आणि पाणी दिले..
त्यांच्या चेहऱ्यावर वेदनामिश्रीत आश्चर्य पाहून मदनराव म्हणाले..काय पाहताय?? अभिनयाचा सम्राट लीन झालेला पाहवत नाही ना?? असे कसे झाले याच विचारात असाल ना?? एके काळी रंगमंच गाजवणाऱ्या व्यक्तीची इतकी दारुण अवस्था होऊ शकते हे पटत नाही ना???
कलेच्या विश्वात वावरताना..ज्या कलेने मला मान,सन्मान,प्रतिष्ठा,आदर,
पैसा,सौंदर्य,प्रेम सगळे भरभरून दिले त्या कलेने दिलेल्या या सगळ्या सुखांना मी गृहीत धरत गेलो..नशा कलेची असायला हवी होती फक्त..पण मी सगळ्याच नशेत तुडुंब वावरत होतो..कुठलेच असे व्यसन नाही ..जे मी उपभोगले नाही...हळूहळू ही व्यसने मला पूर्णपणे ताब्यात घेऊ लागली..यांचा विळखा आणि कलेशी तडजोड सुरू झाली माझी..व्यसनांचा अतिरेक होऊ लागला आणि हळूहळू कमी कमी होत गेली कामे..तरी माझा दर्प मला योग्य वाटेवर आणेना..माझ्या जागा दुसरे नट घेत होते..हळू हळू अप प्रसिद्धी सुरू झालेली..माझ्या दारूच्या व्यसनाची कीर्ती सर्व दूर पसरली..स्त्री कलाकार माझ्या रंगेल स्वभावामुळे माझ्या सोबत काम नाही करणार असे निर्मात्यांना ठणकावून सांगू लागल्या..आणि हळू हळू मला काम मिळणे संपूर्ण बंद झाले..
जे काही साठवलेले थोडे बहुत..ते सगळे संपले काही दिवसातच..मुलांनी कधीच घरा बाहेर काढलेले...लोकप्रियता संपली की तुम्हाला कुत्र सुद्धा विचारत नाही...आणि शिखरावरून तुम्ही एकदा का खाली आलात ना..की वरची आणि खालची दुनिया खूप भिन्न आहे..काहीही संबंध नाही दोघांचा..
माझा आणि नाटकाचा संबंध आता मी फक्त कुणाकडून तरी भिक मागून नाटक बघण्या इतका च राहिलाय...त्यातून सुद्धा चुकीचे मला पाहवत नाही..माझ्यातला कलाकार ते सहन करू शकत नाही..आणि मग आजच्या सारखे होते सगळे..मला हे नवीन नाही..
तू ज बाबा घरी..माझी विचारपूस केलीस..मला ओळखले तू..हे ही कमी नाही..
कलेचा सन्मान आणि आदर करण्याच्या काळात माझ्यातला अय्याश माणूस माझ्यातल्या कलाकाराला प्रत्येक क्षणी मारत होता..खोट्या आणि तात्पुरत्या प्रतिष्ठेच्या बुरख्याने सापासारखे मला जखडून ठेवलेले...कलाकार घुसमटत होता त्या विळख्यात..पण दर्प.. अय्याशी संपत नव्हती.. तिने देशोधडीला लावले आणि मगच थांबली ती..
कलेशी प्रामाणिक न राहणाऱ्या अक्षम्य गुन्ह्याची शिक्षा मी भोगली आहे आणि कायम भोगतोय ...खरे तर या गुन्ह्याला क्षमाच नको...आणि म्हणून माझी आजची अवस्था ही परिणामस्वरूप असलेली शिक्षा असे समजून मी स्वीकारली आहे...जा बाबा तू...
अभिनयाच्या एका बेभान वादळाला शरण गेलेले पाहणाऱ्या त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी तराळले...
एका शाही साम्राज्याचा असाही अंत पहावा लागेल हे पचत नव्हते पण सत्य समोर होते...
रंगभूमीवरच्या प्रत्येक प्रयोगाच्या प्रवेशा सोबत मागच्या दाराने घुसणाऱ्या प्रलोभानांच्या आणि प्रसिद्धीच्या मंचावर कधीही प्रवेश न करण्याचे धैर्य आणि संयम ज्याने बाळगला..तोच या मायावी जगात शिखरावर असेल कायम आणि कलेचा मनसोक्त आणि मनमुराद आनंद घेत असेल..अन्यथा टाळ्या वाजवणारे तेच हात तुम्हाला हाताला धरून त्याच रंगमंचावरून खाली ओढायला आणि बाहेर काढायला कमी करणार नाहीत हेच कटू असेल तरी सत्य असेल...

- विनय वाघ
सहज सुचलं म्हणून

फेसबुक : https://www.facebook.com/sahajsarathihelp
युट्युब : https://youtube.com/?si=qvF_T9PpgMVZRwjp
इंस्टाग्राम : https://www.instagram.com/sahajsarathihelp/

मराठी माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व स्तरांवर उपलब्ध असलेल्या मार्गदर्शनासाठी ....जॉईन करा..
हा ग्रुप कुणाचीही खाजगी माहिती किंवा नंबर सुद्धा कुणाशी शेअर करत नाही..

सहज सारथी परिवार व्हॉट्सॲप कम्युनिटी :
https://chat.whatsapp.com/FB8VfKD1ftq1iZNGJYgedq
धन्यवाद
सहज सारथी टीम.
www.sahajsarathi.in
Call +91 8689 8484 04 / 08

Copyright © 2024 सहज सारथी - विनय वाघ. All rights reserved.

25/04/2024

गेट वेल सून....

कल्पनेत रमणारी ...कल्पनेतच जगणारी आणि कल्पनेतच संपणारी काही मंडळी...तुमच्या आमच्यातीलच...तरीही खूप वेगळी...सत्य,वास्तव आणि वर्तमान यांची जाणीव नसते असे नाहीच यांच्या बाबतीत..तरीही खयाली पुलाव...म्हणजेच स्वतः च एक वेगळे विश्व निर्माण करायचे कल्पनेतले..त्या विश्र्वा बद्दल विचार करत राहायचे आणि त्या विचारांचा गॉगल घालून इतरांना पाहायचे अशा दृष्ट चक्रात अडकलेली...तुम्ही कितीही समजावा...कितीही आपुलकीने सांगा..त्यांच्यात काहीही बदल होत नसतो..अवास्तव कल्पनांच्या जाळ्यात गुरफटून जाणाऱ्या या व्यक्तिमत्त्वांची स्वतःची अशी एक पद्धत असते जगण्याची..ज्यात सर्व प्रथम मी आणि मीच...ही एक भावना प्रबळ असते..दुसऱ्यांना किंवा त्यांच्या विचारांना जराही किंमत न देणारी ही मंडळी.. स्व प्रतिमा आणि त्या खोट्या प्रतिमेचा तितकाच खोटा अभिमान फक्त इतरांसमोर प्रदर्शित करणे यात समाधान मानणारी ही मंडळी..बुद्ध्यांक जेमतेम असल्यामुळे आपले हसे होतंय याची ही जाणीव नसलेली..
लक्षणे...
कुठलाही संदर्भ आणि वैचारिक पुरावा नसतानाही सहज इतरांना चूक किंवा बरोबर ठरवण्याचा मक्ता जणू काही यांनाच दिलाय अशा थाटात बोलणे...
स्वतःच्या कल्पना आणि विचार इतरांवर लादण्याचा केविलवाणा प्रयत्न करत राहणे..कल्पनेत रमताना ही कल्पना वास्तवात कधीच आलेलीच नाही आजवर हे सत्य माहित असूनही त्याच कल्पनेची आस धरणे..
आतून पोखरली गेलेली पण मुखवटे धारण करण्यात प्रतिभा असलेली...
माझ्या विचारांशी सहमत असलेल्या लोकांचा कळप जमवून त्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीचा मार्ग दाखवण्यात कमी न पडणारी..
इतरांना फक्त स्वतः च्या कल्पनेतून बघणारी ही मंडळी..
जमात आहे ही...या जमातीचा सखोल अभ्यास केलात तर जाणवेल..एका विशिष्ट प्रकारची च भाषा या जमातीतले सगळेच बोलतात..
आपल्याला शाळेत शेखचिल्ली ची गोष्ट होती.. फांदीवर बसून कल्पनेत रममाण होऊन ज्यावर बसलोय त्याच फांदीला कापणारी मंडळी..कल्पनेत कुणी रमावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे..पण फांदी आपण हळू हळू कापतोय याचे भान नसणे म्हणजे निर्बुद्ध पणाचा कळस असतो..
यांच्या इतर बाबतीत काहीही विशेष नसते..अतिशय सर्वसामान्य पद्धतीचे जगणे जगणारी ही मंडळी इतरांना आम्ही कसे सामान्य नाही हे सांगण्याची एकही संधी सोडत नाहीत...खरे तर ही व्यथा आहे त्यांची..जी अशा पद्धतीने फक्त व्यक्त होत असते..त्यांच्या उभ्या आयुष्यात उल्लेख करता येईल किंवा सन्मानाने जगा समोर आणता येईल असे काहीही नसते...काहीही वेगळे झेंडे यांनी गाडलेले नसतात..आणि या पुढे गाडतील अशी शक्यताही नसते..पण दुसऱ्यांच्या फडकणाऱ्या झेंड्यात मात्र त्रुटी काढण्यात यांचा हात कुणीही धरू शकणार नाही...मानसिकताच इतकी दरिद्री की आपल्याशिवाय इतरांच्या त्रुटी शोधणे आणि त्या जगासमोर मांडणे हेच जर आयुष्य असेल तर मात्र यांच्या आयुष्यातील ध्येय काय असतील याची कल्पनाच न केलेली बरी..
खोट्या नेतृत्वाचा एक बुरखा मग अशी मंडळी घालायला लागतात..आमचे समाजकारण आणि आमचे विचार कसे योग्य हे दाखवण्यात यांची ऊर्जा खर्ची होत असते..काहीही करत नसतात ही मंडळी.. कल्पनेतून बाहेर येऊन काहीतरी करायला कुवत,क्षमता आणि बुद्धी लागते हे खरे आहे..या तिन्ही चा अभाव आहे आपल्याकडे हे जाणतात ही मंडळी..आणि त्या नंतर या तिन्ही गोष्टी आमच्याकडे ही आहेत हे दाखविण्याचा व्यर्थ प्रयत्न जळी स्थळी काष्ठी पाषाणी होऊ लागतो..आणि या प्रयत्नात यांचे बुरखे अगदी फाटून निघण्याइतकी अवस्था होते..उघडे पडतात हे तथाकथित सज्जन...स्वतः च्या वरिष्टांसमोर माना खाली घालून निमूट उभे राहणारे हे खयाली मास्टर इतरांसमोर माना उंचावून निडरतेची व्याख्याने देत फिरताना दिसतील तुम्हाला आजूबाजूला..स्वतः च्या खोट्या कोशात अडकलेल्या या मंडळींना वास्तवाचे भान असूनही त्यांची इतरांबद्दल असलेली असूया त्यांना योग्य मार्गावर यायलाच देत नाही..
खोटया विचारांचा आरसा घेऊन ही मंडळी आपल्यापेक्षा कमी बुद्ध्यांक असलेल्या मंडळींना जमवून त्यांच्या भावनांशी खेळून स्वतः मात्र आपल्या राक्षसी किंवा कधीतरी अगदीच बाळबोध आणि निरर्थक कल्पनेत रमणे सोडत नाहीत..
सांगायचा मुद्दा असा की अशी मंडळी आजूबाजूला असणार..सतर्क राहायचे..खरेतर रुग्ण या पद्धतीने त्यांच्या कडे पाहायला हवे..रुग्ण आजारपणामुळे अस्वस्थ होतो..चिडचिड होते त्याची..काहीही बरळतो..तसेच काहीसे..फार गंभीरपणे यांना घ्यायचे नाही..आणि स्वतः च्या वर्तुळात यांना शिरू ही द्यायचे नाही..यांचे पुलाव सुरू राहू देत..त्यांच्या त्यांच्या किचन मध्ये ते करत आहेत..करू द्या त्यांना..यांना समजावण्याचा प्रयत्न ही करू नका..उपयोग होणार नाही..
अहंकाराने तुडुंब भरलेली आणि त्याच व्याधीने आयुष्याच्या रुग्णालयात भरती झालेल्या या मंडळींसाठी फक्त Get well soon अशी प्रामाणिक इच्छा ठेवा..देव यांना सद्बुद्धी देवो आणि लवकरात लवकर योग्य मार्गावर येऊ दे यांना अशी प्रार्थना करू..कारण तेव्हढेच होऊ शकते..
आणि हो...एखाद्या दिवसासाठी तुम्ही सुद्धा चुकून ऍडमिट झाला असाल या रुग्णालयात तर आज घ्या डिस्चार्ज....
खऱ्या आणि वास्तववादी कल्पनांची अमर्याद क्षितिजे या रोगातून बाहेर पडल्यावरच दृष्टीस पडतील...
घ्या त्यांना तुमच्या कवेत..

विनय वाघ
सहज सुचलं म्हणून
सहज सारथीसह आनंदी आयुष्याचा दिशेने तुमच्या प्रवासाला सुरवात करा. असेच सकारात्मक मार्गदर्शन आणि प्रेरणेसाठी आमचे पेज फॉलो आणि शेयर करा.
संपर्क क्रमांक: +91 8689 8484 04 / 08
फेसबुक : https://www.facebook.com/sahajsarathihelp
युट्युब : https://youtube.com/?si=qvF_T9PpgMVZRwjp
इंस्टाग्राम : https://www.instagram.com/sahajsarathihelp/
व्हॉट्सॲप: https://chat.whatsapp.com/HP57GBkjuteBUJWRHkURhb
Email: [email protected]
Copyright © 2024 सहज सारथी - विनय वाघ. All rights reserved.

24/04/2024

शॉर्ट कट....

वेळ आणि ऊर्जा वाचत असेल तर शॉर्ट कट घ्यायला हरकत काय ??
प्रश्न वाजवी होता...समोरून सरळ सरळ विचारला गेलेला ..याचा अर्थ शॉर्ट कट चांगला की वाईट या विषयावर समोरच्या व्यक्तीला अनेकांकडून प्रबोधनाचे डोस मिळाल्या नंतर हा प्रश्न थोड्याशा पोटतिडकीने आणि काहीशा नाराजीने माझ्यासमोर मांडला गेला..
तारुण्याची ऊर्जा आणि चैतन्य मला हा प्रश्न विचारीत होते..
त्यांना रुचेल अशा भाषेत त्याचे उत्तर जाणे गरजेचे होते...
शॉर्ट कट वेळ आणि ऊर्जा शिवाय कष्ट सुद्धा वाचवत असेल आणि ते वाचवून सुद्धा तुम्ही अपेक्षित परिणाम साध्य करत असाल आणि ही प्रक्रिया कुठल्याही अडचणी शिवाय असेल आणि आनंददायी असेल आणि ते करताना माझा आतला आवाज सांगत असेल की कुठलेही चुकीचे काहीही मी करत नाहीये तर शॉर्ट कट चांगलाच असेल...माझे उत्तर...
थोडेसे सविस्तर सांगाल का सर??? पुन्हा प्रश्न...
सारासार विचार केलास तर आपण शॉर्ट कट का घेतो?किंवा घ्यावासा वाटतो त्या मागे काय कारणे असावीत??
एखादा सरळ मार्ग समोर असताना आपण जर शॉर्ट कट निवडत असू तर निश्चितपणे त्यामागे काहीतरी विचार असणार ना?? वेळ वाचवायचा असेल म्हणजे जे साध्य करायचे आहे ते वेळेच्या आधी झाले तर होणारे फायदे असावेत.. विना प्रयास जर साध्य समोर येत असेल तर प्रयास का करावेत असा विचार येणे स्वाभाविक आहे..
तुला जर कळत असेल तर शॉर्ट कट किंवा लाँग कट घेण्यामागची मुख्य भूमिका ही मला काहीतरी हवंय या इच्छेने सुरू होणारी आहे हे विसरू नये..आता ही इच्छा रास्त आहे ..योग्य आहे की अयोग्य आहे हा तर पुढचा भाग आहे...त्यावर आता चर्चा नको..पण काहीतरी इच्छारुपी खुणावतेय ज्यासाठी मी प्रवासाला निघतोय हे मात्र खरे आहे..
गुगल चा मॅप तुम्हाला शॉर्ट कट किंवा शॉर्ट् रुट दाखवतो ना?? ते अतिशय प्रगत तंत्रज्ञान आहे..पण तो रूट तुमच्या पर्यंत येताना त्यामागे एक सतर्क आणि सजग यंत्रणा काम करत असते हे आपण विसरायला नको..डोळे विस्फारून असलेले कॅमेरे आणि वरून सखोल निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला शॉर्ट रूट सुचविला जातो..फार म्हणजे फार महत्वाचे आहे हे..आणि इतकी काळजी घेऊन सुद्धा बरेचदा चुकीच्या मार्गावर येतो आपण...
आयुष्याचे पण तसेच आहे राजा...आपल्याला हे शॉर्ट कट खुणावत राहतात ..कायमच..पण त्याची चाचपणी,सखोल अभ्यास..त्यामध्ये येऊ शकणारे अडथळे,अडचणी ..त्यामुळे कदाचित महाग आणि अतिशय महाग पडू शकेल अशा शक्यतांचा विचार...हे काहीही पाहिले जात नाही..रिसर्च केलाच जात नाही आणि फक्त गट फिलिंग वर त्या शॉर्ट कट ला कवटाळून आपण पुढे जायचा निर्णय घेतो..त्यामुळे पुढे जर काही अडचणी आल्याच तर हाच शॉर्ट कट खूप लाँग कट होण्याच्या शक्यतेलाही नाकारता येणार नाही...
सध्या झटपट यशस्वी आणि श्रीमंत होण्यासाठी बरेच शॉर्ट कट घेण्याच्या प्रथा रुजू झाल्या आहेत..
यशाचा शॉर्ट कट असू शकेल का?? यश हे भौतिक परिमाणात मोजले जात असेल तर कदाचित हो..म्हणजे खूप पैसे कमावणे म्हणजे यश ही व्याख्या असेल तर लॉटरी,नव्याने सुरू झालेले गेम्स,वैगरे माध्यमातून तुम्हाला मिळू शकतात..अनैतिक मार्गांनी..लाच घेऊन..ज्याला गुन्हा मानले जाते अशा पद्धतींचा अवलंब करून सुद्धा पैसे कमावता येतातच की..पण म्हणून ते करावे का?? हा शॉर्ट कट घेशील का बाबा तू??झटपट श्रीमंतीचा शॉर्टकट घेतलेली जवळच्या वर्तुळातील दोन व्यक्तिमत्त्व आहेत.एकाच्या आयुष्यातील चौदा वर्षे तुरुंगात गेली आणि तिथेच मृत्यू..ही व्यक्ती फक्त झटपट श्रीमंत व्हायला गेली हीच चूक..दुसरी व्यक्ती आता आत्महत्येच्या प्रयत्नातून कुणीतरी वाचवल्यामुळे जीवंत आहे पण संपूर्ण डिप्रेशन मध्ये आहे..याच व्यक्तीकडे पैसे गुंतवलेले अतिशय बुद्धिवंत नागरिक मुलांच्या भविष्याचे आता काय करू या विचारात रोज फेऱ्या मारत आहेत पैसे परत मिळावेत म्हणून..जे कधीही मिळणार नाहीत हे माहीत असूनही.. शॉर्ट कट..
प्रसिद्ध म्हणजे उत्तम ही मानसिकता जोपासून प्रसिद्धीच्या मागे लागून,मीडिया ला जवळ बाळगून काही काळासाठी प्रसिद्ध होऊ सुद्धा..प्रतिभेचे काय???त्यासाठी साधनाच लागते..त्यासाठी अजुन तरी शॉर्ट कट उपलब्ध नाही..
तुला काय हवंय हे जास्त महत्त्वाचं आहे नाही का??
मला तंत्रशुद्ध खेळायला आवडते हे साध्य असेल तर साधना आहे त्या मागे..नो शॉर्ट कट...पण तुला आयपीएल चा प्रसिद्ध खेळाडू व्हायचंय आणी ते ही कमी वेळात तर तशा संधी सुद्धा आता आहेत..तुला ठरवायचे आहे..
जस्ट सांगतोय तुला...तुला परिचित असलेल्या कितीतरी प्रतिभावान मंडळी बद्दल..
लता दीदी,सचिन तेंडुलकर,नीरज चोप्रा, अरजीत सिंग,नवाजुद्दीन सिद्दीकी...आणि बरीच नवे येतील ..काय वाटतं?? शॉर्ट कट असतील का ?? अभ्यास केलास तर कळेल ..प्रतिभेला गवसणी घालताना शॉर्ट कट नको ही मानसिकता भक्कम करावी लागते.. प्रचंड ध्यास आणि डेडिकेशन यांच्या संयोगातून बाहेर येणारी प्रतिभा ही एका विशिष्ट प्रकारच्या प्रयत्नांना आलेले यश असते..त्यात कधीही कुठंही शॉर्टकट असूच शकत नाहीत..
कधीतरी घेतलेल्या शॉर्ट कट नी तुम्हाला अचानक साध्य गवसण हा नशिबाचा सुद्धा भाग असू शकतो..आणि त्यात आनंद च आहे..आणि अभ्यासपूर्ण निवड करून,प्रक्रियेचा अभ्यास करून ,मेहनत आणि डेडिकेशन ने जर तुम्ही मार्ग निवडत असाल..रिसर्च व्यवस्थित असेल ,शक्यता आणि त्यांचे परिणाम यांचा लेखाजोग झालेला असेल आणि प्रक्रिया शक्य तितकी वेदनारहित असेल तर तो शॉर्ट कट नाहीये..तो योग्य रस्ता आहे...इतके सरळ आहे..तू चेक करून घेशील..या सगळ्या गोष्टी तपासून पुढे जाणे होत असेल तर योग्य असेल ते..
सुजाण असशील तर शॉर्ट कट किंवा लाँग कट असा विचार न करता योग्य मार्गाचे अनालिसिस करून परिणामांना गवसणी घालण्याचा ध्यास ठेवणारा मार्गस्थ हो...फसव्या शब्दांना जवळ ही करू नकोस.. प्रतीमेतल्या प्रतिभेला आणि प्रतिभेने येणाऱ्या प्रतिमेचा कायम आदर करणारा निष्ठावान साधक बन...आणि मग बघ कसे संपूर्ण युनिव्हर्स तुझ्यासाठी हात जोडून उभे राहील ते..तुला इच्छित स्थळी घेऊन जायला...
समोरच्या तारुण्याच्या ऊर्जेच्या डोळ्यात काहीतरी चमकताना पाहिले मी...एक मंद स्मितहास्य त्याच्या चेहऱ्यावरचं बरेच काही सांगून गेले...

विनय वाघ
सहज सुचलं म्हणून

सहज सारथीसह आनंदी आयुष्याचा दिशेने तुमच्या प्रवासाला सुरवात करा. असेच सकारात्मक मार्गदर्शन आणि प्रेरणेसाठी आमचे पेज फॉलो आणि शेयर करा.

संपर्क क्रमांक: +91 8689 8484 04 / 08
फेसबुक : https://www.facebook.com/sahajsarathihelp
युट्युब : https://youtube.com/?si=qvF_T9PpgMVZRwjp
इंस्टाग्राम : https://www.instagram.com/sahajsarathihelp/
व्हॉट्सॲप: https://chat.whatsapp.com/HP57GBkjuteBUJWRHkURhb
📧 Email: [email protected]
Copyright © 2024 सहज सारथी - विनय वाघ. All rights reserved.


23/04/2024

कित्येक...

वारंवार हा शब्द आपल्या वापरात येत असतो...या शब्दाच्या मुळाशी जाऊन त्याचा गाभा शोधण्याचा मोह मला नाही आवरला....
काय असेल कित्येक म्हणजे..अनेक अशा अर्थाने जरी आपण घेत असलो तरी त्यात अजून गूढार्थ आहे असे मला जाणवतेय..कितीतरी आणि एक असा त्याचा अर्थ असावा असे मला राहून राहून वाटतंय..
अनेक अनुभव आयुष्यात येऊन गेल्यानंतर कदाचित याची जाणीव आपल्याला होते...अनेक जण ..कितीतरी जण भेटले असतील आपल्याला..पण एखादी व्यक्ती अशी असेल ज्याने खूप योगदान केलेले असेल तुमच्या आयुष्यात...त्या एका व्यक्तीमुळे आयुष्य वेगळ्याच उंचीवर गेलेले असेल..
आता पर्यंत जीवन प्रवासात कित्येक अनुभव घेतलेले असतील पण एखादा अनुभव असा असेल जो कायम स्मरणात राहिलाय...आज ही स्फूर्ती देतोय..
प्रत्येक बाबतीत लागू होऊ शकणारी ही गोष्ट...
एखाद्या कलाकाराने कितीतरी चित्रे काढली असावीत..प्रत्येक चित्र समाधान देऊन गेलेले असावे त्याला..तरीही एखादे चित्र खूप खास असेल त्याच्यासाठी..त्यालाही नाही माहित..कसा कुंचला फिरला त्या वेळी...
प्रतिभावंत अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने आतापर्यंत कितीतरी उत्कृष्ट परफॉर्मन्स दिलेत..पण एखादा मात्र आज ही आपल्या मनावर राज्य करतोय..
लता दीदी किंवा मोहम्मद रफी यांना संगीताची विद्यापीठ म्हणू आपण..तरीही एखादे लग जा गले..किंवा ए मेरे वतन के लोगो....किंवा कर चले हम फिदा..काळजाच्या इतके जवळ आहे की लता दीदी आठवल्या की मला हेच आठवते...
क्रिकेट चे कितीतरी अविस्मरणीय सामने अनुभवले...आणि आता तर आयपीएल च्या जमान्यात चित्त थरारक शेवट जवळजवळ रोज बघतोय आपण..तरीही कपिल च्या टीम ने वेस्ट इंडिज ला नमवून आपल्या देशात आणलेला विश्वचषक खास आहेच..आठवणीत असलेला क्षण आहे तो.. कित्येकातल्या खास एका क्षणांचा साक्षीदार...
कित्येक म्हणजे शेकडो लेख झालेत आता पर्यंत..शेकडो नी कविता ही झाल्यात..
तरीही देवळाबाहेर चा विठ्ठल हा लेख माझ्यासाठी अतिशय खास आहेच..अगदी सुरवातीच्या काळातला असूनही..आज ही..
कितीतरी वाचक आज ही रोज प्रतिक्रिया देत आहेत..पण रोज येणाऱ्या लेखांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवून त्यांना निष्ठेने फॉलो करून जीवन समृद्ध करण्याच्या प्रयत्नांत प्रामाणिकपणे असलेला आमच्या मित्रांपैकी च एक मित्र हा कित्येक लेख वाचणाऱ्या मंडळी पेक्षा खरेच खूप वेगळा आहे..
हजारो विद्यार्थी शहाणपणाच्या आगळ्या वेगळ्या शाळेत येऊन गेलेत..शिकून गेलेत..पण त्या शिक्षणाचे महत्व जाणून ..शिकवलेली सगळी तत्वे,कृती योजना अतिशय निर्धाराने फॉलो करताना..येणाऱ्या सगळ्या अडचणींना तोंड देऊन..सामान्य ते सेलिब्रिटी या पदावर पोचलेला विद्यार्थी सुद्धा त्यातच आहे..शिक्षणाची प्रचंड भूक असलेली आणि शिक्षण हीच माझी ओळख आणि अस्तित्व असेल हे ठणकावून सांगणारी आगळी वेगळी विद्यार्थिनी सुद्धा आहे..
तंत्रज्ञान प्रगतशील होतंय..रोज नवनवे शोध लागत आहेत..कित्येक नव्या संशोधनाने जीवन आणि जगणे ढवळून निघते आहे..पण तरीही नव्वदीच्या दशकात आलेला कॉम्प्युटर आणि त्या नंतर आलेल्या मोबाईल प्रणालीने जीवनाचा स्तर बदलला आहे हे सत्य आहे...
आता पर्यंत अनेक प्रवास झालेले असतील ..पिकनिक ,पार्ट्या अनेक झाल्या असतील..तरीही या प्रत्येक गोष्टीत एखादी पिकनिक किंवा एखादी पार्टी आज ही स्मरणात असेल आणि कायम राहील अशी खात्री सुद्धा असेल..
अनेक शाळा अस्तित्वात आहेत..पण मुलांना मूल्य वर्धित शिक्षण देणारी आणि त्यांच्यातल्या वेगळेपणाचा शोध घेत त्यांना घडवणारी एखादीच असेल..
अनेक हॉटेल मध्ये जाऊन जेवणाचा आस्वाद घेतला असेल आजवर..पण ग्राहक हाच देव समजून त्याला हवे नको ते प्रेमाने विचारून खाऊ घालणारी एखादी आजीची खानावळ आली असेल तुमच्याही भेटीला...
शेकडो कार्यकर्ते पाहिले असतील तुम्ही राजकारणात..
पण समाजकारण हेच राजकारण मानत इतरांची सेवा करत आज कितीतरी वर्षे चाळीतच राहणारे नेतृत्व सुद्धा आहे..एखादेच असेल कदाचित..पण आहे..त्यांना जे ओळखतात त्यांच्या मनात प्रचंड आदर असलेले व्यक्तिमत्त्व..एखादेच..
आता उपचार करून काहीही उपयोग नाही असे कित्येक डॉक्टर्स नी सांगितल्या नंतर खेड्यातला एखादा वैद्य आत्मविश्वासाने सांगतो की मी बरे करेन तुमच्या मुलाला..आणि काहीही पैसे न घेता सलग तीन महिन्यात संपूर्ण बरा ही करतो.. कित्येकांमध्ये असलेला आगळावेगळा एक..देवदूत..
काय वाटतंय....कितीतरी उदाहरणे देता येतील..
आयुष्य अशा कितीतरी अनुभवांची शिदोरी जरी असली तरी सुखाचे मोती शिंपडणारे हे एखादेच क्षण खरेतर आयुष्य सुंदर करून जातात..आणि अनेक गोष्टीतून जाणे हे क्रमप्राप्त जरी असले तरी त्या एखाद्या शांत ,सुखद , गारव्याच्या अनुभवाने जगणे समृद्ध होत जाते..
कितीतरी आणि एक याचे संयुग म्हणजे जीवन असेल का?? तर मला भावलेले उत्तर आहे ..हो..त्या एकाची सर त्या अनेकांना नाही..पण अनेक आजूबाजूला आहेत म्हणूनच त्या एकाचे महत्व ही आहे....
आणि म्हणूनच कित्येक हा शब्द मला खुणावतो नेहमी..
तो सांगतोय त्या अनेक व्यक्तीत ती एक व्यक्ती आहे..त्या अनेक पुस्तकात ते एक पुस्तक आहे..त्या अनेक गाण्यांमधून एक गाणे आहे..त्या अनेक विषयामध्ये एक विषय आहे ज्याने आयुष्य किती सुंदर आहे याची प्रचिती दिलीय..
त्या एका साठी जगायचे...कदाचित हा मेसेज मी घेतला असावा..
झाले बहु होतील बहु..
परी या सम हा..हे व्यक्तिबाबत असले तरी निरनिराळ्या अनुभवांबाबत सुद्धा लागू पडतेय..त्या आगळ्या वेगळ्या एकासाठी जगत राहायचे आणि मिळाले की त्या शिडकाव्यात न्हाऊन निघायचे हेच खरे...
मी तरी कित्येक या शब्दाला असे पाहतोय..तुम्ही पहाच असे काही नाही..पण विचार करायला काय हरकत आहे??
कदाचित अनेक विचारांपैकी हा एक विचार हाच आगळावेगळा आणि जगणे समृद्ध करणारा ठरेल...कुणी सांगावं???

- विनय वाघ
सहज सुचलं म्हणून
+91 98923 18395
@ Copyrights Reserved

सहज सारथी - संपर्क क्रमांक: +91 8689 8484 04 / 08
फेसबुक : https://www.facebook.com/sahajsarathihelp
युट्युब : https://youtube.com/?si=qvF_T9PpgMVZRwjp
इंस्टाग्राम : https://www.instagram.com/sahajsarathihelp/
व्हॉट्सॲप कम्युनिटी : https://chat.whatsapp.com/FB8VfKD1ftq1iZNGJYgedq
www.sahajsarathi.in

Address

325-326, Samikaran Aptt, Sant Janabai Road, Vil Parle East
Mumbai
400057

Telephone

9892318395

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vinay wagh&associates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share