29/07/2025
हे आहेत स्टेट बँकेचे गृह कर्ज सल्लागार श्री. संदीप शिवथरे. कोणताही व्यवसाय म्हणल्यावर अनेक जणांची मोट बांधणे हे आलेच. आमच्या व्यवसायात देखील इतर इस्टेट एजंटची मदत घेणे, त्याचबरोबर विकायला आलेला फ्लॅट साफ करण्यासाठी एक माणूस कायम तत्पर ठेवणे, त्या फ्लॅटच्या किल्ल्या आमच्याकडे असतात अशावेळी तिथे इलेक्ट्रिसिटीचा काही प्रॉब्लेम झाला , प्लंबिंग चा काही प्रॉब्लेम झाला, तर त्या संदर्भातला माणूस आपल्यासोबत असणे, कधी फ्लॅट रंगवावा लागतो तर तो रंगवून घेणे, फ्लॅटच्या जाहिराती करणे मग त्या सोशल मीडियातील असोत की वर्तमान पत्रातील, व्यवहार ठरल्यावर खरेदीदाराच्या कर्जासाठी सल्लागार शोधणे, सातबारा उतारा किंवा सिटी सर्वे उतारा यातील नोंदीमध्ये काही चूक असेल तर ती चूक दुरुस्त करून घेण्यासाठी लोकांची गरज भासते , सब रजिस्ट्रार ऑफिस मधून कागदपत्रे काढावे लागतात तर कधी टाऊन प्लॅनिंग ऑफिस किंवा नगरपालिकेतून जुने प्लॅन, बांधकाम परवानगी, लेआउट, एन ए ऑर्डर, भोगवटा प्रमाणपत्र अशी कागदपत्रे काढावे लागतात. एखाद्या वकिलांकडून सर्च रिपोर्ट करून घ्यावा लागतो, ज्या त्या बँकेच्या व्हॅल्यूएटरची व्हिजिट असते, टेक्निकलच्या ऑफिसरची व्हिजिट असते, त्यानंतर खरेदी पत्राचे किंवा साठेखताचे वेळी मदत लागते ती स्टॅम्प vendor,बोंडरायटर यांची पण या सगळ्यात मुख्य भूमिका असते. बँक अथवा फायनान्स इन्स्टिट्यूटने नेमलेल्या एच एल सी अथवा डी एस एच असते. कर्जदाराच्या कागदपत्रातील अनियमितता, काही कागदपत्रे कमी जास्ती असणे, कधी उत्पन्न जास्त असेल तर कागदावर कमी दाखवले जाते तर कधी याचे अगदी उलट म्हणजे पण उत्पन्न दुप्पट करून दाखवले जाते. नियोजित कर्जदाराची इतर कर्जे चालू असतात तिथून काही कागदपत्रे स्टेटमेंट गोळा करावी लागतात किंवा ती कर्ज प्रकरणे नील करावी लागतात. त्या त्या इन्स्टिट्यूट कडून त्या कर्जाची माहिती घ्यावी लागते. त्या बँकेच्या पॅनल वरील वकिलांचे समाधान होईल अशी ते मागतील ती कागदपत्रे त्यांना पुरवावी लागतात. आपल्याला अपेक्षित व्हॅल्युएशन येण्यासाठी तेथील परिस्थिती, मार्केट रेट्स याबद्दल त्यांना सांगावे लागते. नंतर शाखेत म्हणजे बँकेच्या शाखेत इनडोअर स्टाफ च्या नजरेत ज्या काही त्रुटी येतील त्याची परिपुर्तता करावी लागते.
नुकताच मी एक फ्लॅट विकला. अत्यंत वेगळा अनुभव होता. बिल्डिंग खूप जुनी, मंजूर नकाशावरील फ्लॅटचे क्षेत्र आणि प्रत्यक्षात वहिवाटी पासून असलेले फ्लॅटचे क्षेत्र यातील तफावत, इमारत जुनी असल्याने जीर्ण झालेली कागदपत्रे की ज्यावर खूप अस्पष्ट दिसत होते. फ्लॅट विकणाऱ्यांची भूमिका आणि विकत घेणाऱ्यांच्या कागदपत्रांची जुळवाजुळव, बँकेने काढलेल्या त्रुटींची पूर्तता, कर्जदारांकडून कमी पडणाऱ्या कागदपत्रांसाठीची धावाधाव, काही आवश्यक अशा कागदपत्रांसाठी देखील श्री. शिवथरे यांनी स्वतः धावाधाव केली. हा व्यवहार आम्हाला देखील खूप काही नवीन शिकवणार होता. कारण इतक्या वर्षाच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच अनेक विषयांना सामोरा गेलो . मूळ कागदपत्रे नसणे, असलेल्या कागदपत्रांमध्ये अनियमितता असणे, फ्लॅटच्या विक्रीदारांनी खरेदीपत्रापर्यंत कुठलेही मूळ कागदपत्र जमा न करण्याबाबत ठाम भूमिका घेणे अशा अनेक अडचणीतून हा व्यवहार पार पडला. त्यासाठी सातारा ते कोल्हापूर अशा पाच ट्रिपा मला कराव्या लागल्या तेव्हा कुठे आंबा पडला.
तर वर नमूद केलेल्या आमच्या कामाच्या परीघातील अनेक घटकांपैकी एक घटक असलेले स्टेट बँकेचे गृह कर्ज सल्लागार श्री. संदीप शिवथरे यांची या व्यवहारात आम्हाला मोलाची मदत झाली. तांत्रिक आणि कायदेशीर कारणास्तव सगळी माहिती येथे सविस्तर देता येणार नाही. परंतु या प्रकरणासाठी त्यांनी जी धावाधाव केली, जे परिश्रम घेतले, स्वतःच्या खिशाला चाट सोसून काही कागदपत्रे मिळवली , खरेदीदार आणि विक्रीदार यांच्या प्रश्नांचे सरबतीला तोंड दिले आणि अत्यंत पेशंसने शेवटपर्यंत चिकाटीने लढून हे कर्ज मंजूर करून घेऊन नंतर सुद्धा त्याच चिकाटीने मला चेक मिळवून दिले हे काम खरंच खूप कष्टाचे, मानसिक त्रासाचे, स्वतःची परीक्षा बघणारे, स्वतःचा कस बघणारे आणि स्वतःची प्रतिष्ठा तसेच मनोबल वाढवणारे देखील होते. त्यात स्टेट बँकेचे एच एल सी श्री. संदीप शिवथरे हे 101% उत्तीर्ण झाले. 30-35 वर्षे जुन्या फ्लॅटचा एक व्यवहार करायचा असेल तरी किती घटकांची मला जुळवून घ्यावे लागते ते वर नमूद केलेले आहेत पण या व्यवहारात श्री. संदीप शिवथरे यांनी खूप मोलाची मदत केली आणि हा व्यवहार पूर्ण होण्यासाठी मला मौलिक साथ दिली. याबद्दल श्री संदीप शिवथरे यांचा ऑफिसात बोलवून कृतज्ञतापूर्वक सत्कार केला आणि आभार मानले त्याप्रसंगीचे छायाचित्र.