26/06/2022
पिशव्या परतल्या.
नगरपालिकेने प्लास्टिक विरुद्ध मोहीम सुरु केली . प्लास्टिक बंदी . जो वापरेल त्याला जबर दंड भरावा लागेल . सर्व शहरात हि बातमी सर्व माध्यमाद्वारे जनमानसात पोहोचवण्यात आली .
नगरपालिकेच्या चिफ ऑफिसरने सदा सदावर्तेला या मोहिमेचा प्रमुख नेमला . त्याच्या सोबतीला चार तरुण कर्मचारी दिले आणि सोबत एक जीप देखील देण्यात आली . सदा प्रामाणिकपणे कामाला लागला . जिथे सर्वात जास्त प्लास्टिक वापरले जाते त्या बाजारात त्याने प्लास्टिक बंदीची पत्रके वाटली . मोठं मोठया व्यापाऱ्यांना तो प्रत्यक्ष जाऊन भेटला . व्यापाऱ्यांनी देखील त्याचे स्वागतच केले . पण ग्राहकांना माल प्लास्टिकच्या पातळ पिशवीतून देणे कांही त्यांनी थांबवले नाही. सदा पुन्हा व्यापाऱ्यांना जाऊन भेटला . प्लॅस्टिकच्या पिशव्या देऊ नका म्हणून व्यापाऱ्यांना विनंती केली. " गिऱ्हाईक मागतात , नाही दिले तर पुढच्या दुकानात जातात . धंदा जातो . प्लास्टिक नाही तर दुसरे काय ? " या व्यापाऱ्यांच्या प्रश्र्नाला सदाकडे चोख उत्तर नव्हते.
प्लॅस्टिकची पिशवी वापरून झाली कि रस्त्यावर टाकून देणारा माणूस खरा गुन्हेगार आहे हे सदाला पटत होते .
त्याने अशा माणसांना रंगे हाथ पकडण्याचा प्रयत्न केला . पण त्यात त्याला फारसे यश मिळाले नाही . जी माणसे पकडली गेली त्यांची दंड भरण्याची कुवतच नव्हती .
या मोहिमेतून कांही रेव्हिन्यू मिळेल अशी सरकार दरबारी आशा होती. ती ही फलद्रुप होईना . सदाला वरिष्ठांकडून बोलावणे आले . त्याला जाब विचारण्यात आला . सदाने त्याच्या अडचणी सांगितल्या . वरिष्ठांना अडचणी नको होत्या, हवा होता रिझल्ट. मोहिमेवर झालेल्या खर्चचा ताळमेळ बसत नव्हता .
पातळ प्लॅस्टिकच्या पिशवीला आपण पर्याय दिला पाहिजे . नगरपालिकेने जर कापडाच्या पिशव्या बनवून व्यापाऱ्यांना पातळ पिशवीच्या किमतीत दिल्या तर प्रश्र्न सुटेल . सदाने हा विचार नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितला . पण पैशाची तरतूद नाही या सबबी खाली त्याचा हा प्रस्ताव प्रथमदर्शनीच फेटाळला गेला .
वास्तविक असे केलेतर कचरा समस्येवर जो कांही खर्च होत होता तो कमी झाला असता आणि ते पैसे कापडाच्या पिशव्या बनवण्यासाठी वापरता आले असते . पण एवढा विचार करायला वेळ कोणाकडे होता ?
सदाच्या प्रस्तावावर विचार न करता त्याच्या कार्यक्षमतेवर शंका घेतली गेली .
सदा पेटून उठला त्याने सटासट व्यापाऱ्यांच्या दुकानावर धाडी टाकल्या . व्यापाऱ्यांकडून जबर दंड वसूल केला . प्लस्टिक पिशव्यांचा साठा जप्त केला . जीप भर भरून जप्त केलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या त्याने त्याच्या कार्यालयात आणून ठेवल्या . गावात बातमी पसरली . स्थानिक वर्तमानपत्रात फोटो सहित बातमी आली .सदावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला . लोक त्याला कार्यतत्पर , क्रियाशील , धडाडीचा कर्मचारी म्हणून संबोधू लागले .
नगरपालिकेच्या सदाच्या ऑफिस मध्ये प्लास्टिक पिशव्यांचा ढीग वाढू लागला . लोकांच्या पायात त्या पिशव्या येऊ लागल्या . एक दोनदा तर जातायेता कर्मचारी त्या पिशव्यांवरून घसरून पडले देखील . थोड्या फार पिशव्या कर्मचाऱ्यांनी घरी देखील नेल्या . पण ढीग कांही कमी होत नव्हता . सदाचा पिशव्या जप्त करून आणायचा ओघ देखील कमी होत नव्हता . जागा अपुरी पडू लागली म्हणून आता पिशव्या पालिकेच्या इमारतीतील मधील चौकात रचण्यात येऊ लागल्या . आता तो ढीग साहेब लोकांच्या दृष्टीस पडू लागला . त्याची त्यांना अडचण होऊ लागली . दबक्या आवाजात चर्चा सुरु झाल्या .
मुख्य साहेबानी सदाला बोलावून घेतले " तुझा प्लास्टिक पिशव्या जप्त करण्याचा वेग कमी कर असा दम देखील भरला . जमा झालेल्या ह्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे काय करायचे ठरवले आहेस ? असा प्रश्र्न विचारला.
सदाने हात वर केले " ते माझे काम नाही ! ती जबाबदारी माझी नाही ! दंड वासून करून मी पालिकेच्या खात्यात जमापण केला आहे . या ढिगाचे काय करायचे हे तुम्हीच सांगायचे " सदाने चेंडू अधिकाऱ्यांच्या कक्षेत टोलवला .
प्लास्टिकच्या पिशव्यांच्या ढिगाने अधिकारी त्रस्त .झाले होते
एके दिवशी एक भंगारवाला नगरपालिकेत डोकावला .
ढीगाकडे पाहत त्याने विचारले " साहेब देना है क्या ? "
साहेब तात्काळ हो म्हणाले .
तो भंगारवाला त्या पिशव्यांचे काय करणार ? हा प्रश्र्न भंगारवाल्याला विचारायचे धाडस साहेबाना झाले नाही .
बाजारात पातळ प्लास्टिकच्या पिशव्या एकदम स्वस्त झाल्या .
पिशव्या परतल्या.
********************
कौस्तुभ ताम्हनकर
९८१९७४५३९३
[email protected]
****************************
गर्दी नसलेले एकमेव
ठिकाण
"माहेर"
गावाकडंच घर
भेटा
www.mahertrip.in
--------------------------------
सुंदर होण्यासाठी आचरणा
www.zerogarbage.co.in
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
‘माहेर ‘ नाव सार्थक झाल्याचा उत्कृष्ट अनुभव . उत्कृष्ट आदरातिथ्य , स्वच्छता , टापटिप , वक्तशीरपणाचेच माहेर . माझ्या ...